वारी हा भागवत संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा आचार धर्म आहे. साधारण पणे समाजात परमार्थ- वारी या गोष्टी सेवानिवृत्तीनंतर करायच्या गोष्टी आहेत असा समज असतो. हा समज यथार्थ नाही. परमार्थ वारी या गोष्टी जीवन कसे जगावे या शिकवणा-या आहेत मग ज्याचे जीवन जगणे अजून शिल्लक आहे त्यांनी या गोष्टींचा अंगिकार करावा . या विषयी एक प्रसिद्ध सुवचन आहे -कौमारात् आचरेत् प्राज्ञः धर्मान् भागवतान ईह । कुमारवयापासून या आचार धर्माचे पालन करावे .श्री तुकाराम महाराज या विषयी म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय । तंव तू आपुले स्वहित पाहे । तीर्थयात्रे जाय चुको नको ॥ वारीला जर जायचे असेल तर वारीरूप आचार धर्माचे पालनासाठीची हातपाय ईत्यादि सामुग्री व्यवस्थित पाहीजे म्हणून वारी हा तरुणांनी अनुष्ठान करावयाचा आचार धर्म आहे. आपण सर्वजण सुखाप्राप्ती साठी अतोनात प्रयत्न करतो पण सर्वाना सुख मिळतेच असे नाही. ते सुखप्राप्त करावयाचे असेल तर काय केले पाहीजे या विषयी श्री तुकाराम महाराज सांगतात- सुखालागी करिसी तळमळ ।तरी तू जाय पंढरीसी एकवेळ । प्रत्येक जण सुख मिळावे याच्यासाठी प्रयत्नशील आहे. तुला जर सुखप्राप्ती करून घ्यायची असेल तर अयुष्यात एकदाका का होईना तू पंढरीस जा आणि तू जर पंढरीस गेला तर काय होईल ? या विषयी श्री तुकाराम महाराज सांगतात- मग तू अवघाची सुखरूप होसी। जन्मोजन्मीचे दुःख विसरसी ॥ तुझ्या सर्व दुःखांची निवृत्ती होवून तू सुखरूपतेस प्राप्त होशील. तसेच आळंदीहून पंढरपूरला जाई पर्यंत सर्व ऋतु बदलांना तोंड द्यावे लागते आणि ही वारी या सर्व भौतिक बदलांना आनंदाने कसे तोंड द्यायचे ते शिकवते. हा अनुभव , व्याववहारिक जीवनात येणा-या चढ उताराना आनंदाने सामोरे जाण्यासाठी उपकारक ठरतो.समुहात एकमेकाना समजून उमजून एकत्रित रितीने कसे वागावे हे शिकवणारा वारी हा एक उदात्त आचार धर्म आहे. या वारीत अनेक संतसज्जनांची संगती घडते आणि ही संगतीच आयुष्यास योग्य दिशा देत असते. एकंदरीत वारी ही आदर्ष परिपूर्ण शिस्तबद्ध मानवी जीवन घडवणारी एक संरचनात्मक संस्था आहे. अजची तरुणाई या संस्थेचा आविभाज्य घटक जर झाली तर जीवनात परिपूर्णता , दुःखविवर्जितता , सामुहिक सौहार्दता ,सुखरूपता निश्चितपणे प्राप्त होईल.
top of page
bottom of page
Comments